Saturday, July 5, 2014

स्कूल चले हम - दिमाखदार प्रवेशोत्सव !!!


मुक्काम-पोस्ट गिऱ्हेवाडी - तालुका भोर - जिल्हा पुणे … १६ जूनची प्रसन्न सकाळ… सजवलेली शाळा … वर्गांना शाळेच्याच आवारातील गुलमोहराच्या फुलांची तोरणे …  रेखीव रांगोळ्या … तीच लगबग … तीच गडबड … तीच उत्सुकता … पुन्हा अनुभवत होतो नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात !!! निमित्त होतं गिऱ्हेवाडी आणि कांबरे गावातील जि.प. शाळेतल्या प्रवेशोत्सवाचे - नवागतांच्या स्वागताचे !!!

गेले २-३ वर्ष माहिती तंत्राद्यान क्षेत्रातील आम्ही काही तंत्रज्ञ एकत्र येउन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 'Personal Outreach for Education' च्या  माध्यमातून  'शालेय वह्या वाटप' हा उपक्रम राबवत आहोत. या वर्षी मे महिन्यात भोर जिल्ह्यातील कांबरे आणि गिऱ्हेवाडी येथील जि.प. शाळांची माहिती मिळाली. मुख्याध्यापकांशी चर्चा करून गिऱ्हेवाडी शाळेतील ११ विद्यार्थी तर  कांबरे शाळेतील १२२ विद्यार्थी यांना शालेय वह्या वाटप करण्याचे ठरले. घाऊक बाजारातून खरेदी, वह्यांचे वर्गीकरण, आकर्षक रंगीत कागदात संच बांधणी, दप्तर खरेदी… सगळ्या गोष्टी जुळून आल्या … आणि सोमवारी सकाळी गिऱ्हेवाडी गाव गाठले.





एका छोट्या खोलीतली शाळा …  पहिली ते चौथी एकाच वर्गात (पुलंची आठवण आली !!!) पटसंख्या ११. मुख्याध्यापकांच्या ओळखीनंतर त्यांनी शाळेची, येथे राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. अर्थात शाळेतल्या भिंती आणि खोलीतला कोपरा अन कोपरा याची साक्ष देत होता. सुविचार, पाढ्यांचे तक्ते, समानार्थी- विरुद्धार्थी शब्द, विविध महित्यांचे संच, नकाशे , ऋतुचक्र , मराठी-इंग्रजी कालगणना, इंग्रजी शब्दांचे उच्चार आणि बरंच काही … जणू काही भिंतीवर शैक्षणिक खजिनाच मांडला होता.



प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वह्यांचा संच आणि दप्तर वाटपाचा कार्यक्रम अगदी 'शालेय' शिस्तीत पार पडला. गावचे सरपंच, गट शिक्षणाधिकारी, गावातील जेष्ठ नागरिक, पालक वर्ग जातीने हजर होते. नवीन दप्तर आणि आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या वह्यांमध्ये लहानगे हरखून गेले. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर आनंद-उत्सुकता-हुरहूर साऱ्या भावना एकत्र दाटून आल्या होत्या.  आणि नव्या कोऱ्या वह्यांचा वास अनुभवायला मुले गुंग झाली. शालेय वह्यांसोबतच लहान मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकाच्या काही प्रती शाळेच्या वाचनालयाला दिल्या. असाच कार्यक्रम कांबरे येथील शाळेतही पार पडला.




खरंतर आपल्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अनेकांचा वाटा असतो. आई वडील, नातेवाईक, शिक्षक…  बरेचसे ओळखीचे … आणि कित्येक अनामिक !!! या साऱ्यांचे ऋण असतात आपल्यावर. अर्थात आम्हाला या ऋणातच राहणे आवडेल. पण आमच्याकडून हा खारीचा वाटा. खरंच सांगतो, तो एक तास एक अनामिक समाधान देऊन गेला. मुलांच्या चेहऱ्यावरील ती निरागसता …  मोठी मोठी स्वप्न…त्यांचा आत्मविश्वास …  सारंच चकित करणारं …मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान आमच्या मनात साठवून या वर्षीची शैक्षणिक वारी पूर्ण झाली. आता वाट बघतोय पुढच्या जून महिन्याची… पुढच्या वर्षाच्या प्रवेशोत्सावाची !!!





सुलेखनकार !!!

शाळेच्या प्रगतीबाबत मुख्याध्यापक अभिमानाने म्हणाले ,'' आमच्या शाळेतले सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी उत्तम रीतीने लिहितात. अक्षर अगदी मोत्याचे दाणे! ". शाळेत असलेली लिखाणाचा सराव करणारी विविध साधने त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत होती.  उजव्या आणि डाव्या हाताने सुवाच्य लिहिणारे विद्यार्थी पाहिल्यावर आपण स्तिमित होतो. भविष्यात यातला एखादा विद्यार्थी सुलेखनकार झाल्यास आश्चर्य वाटायला नको. 


3 comments:

  1. Khup chan Mohan!! Abhiman ahe tuzyasarkhya mitra cha.

    ReplyDelete
  2. Nawagatanche swagat... Kharach chhan concept aahe...

    ReplyDelete
  3. Very Good Mohan. Congratulation to you and your friends. All the best :-)

    ReplyDelete