प्रख्यात
नाटककार शेक्स्पिअरने लिहून ठेवलंय 'नावात काय आहे.' !!! महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदार संघातील विजयी
उमेदवारांच्या नावातील गम्मत शोधण्याचा केलेला हा प्रयत्न !!!
७ पैकी ३ संजय आणि ५ पैकी ३ अशोक लोकसभेत !!!
महाराष्ट्रातील
४८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांवर नजर टाकल्यास लक्षात येतं की यावेळी महाराष्ट्राने ३ संजय आणि ३ अशोक लोकसभेत पाठवले तर ४ संजय आणि
२ अशोक यांना घरची वाट दाखवली. विदर्भातील महत्त्वाच्या अकोला मतदारसंघातून शिवसेनेचे
विद्यमान खासदार संजय धोत्रे आपली विनिंग
स्ट्रीक कायम ठेवली. काँग्रेसचा गेल्या ६० वर्षांचा सांगली या बालेकिल्ल्यातून भाजपचे
संजय पाटील यांनी ऐतिहासिक विजय
संपादन केला तर परभणीतून युतीच्या संजय जाधव यांनी
विजय भांबळे यांना धूळ चारली.
अगदी अंतिम टप्प्यात
उमेदवारी मिळालेले अशोक चव्हाणांवर नांदेडमधला
काँग्रेसचा गड राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. काँग्रेसचा संपूर्ण सफाया होत असतानाही त्यांनी
नांदेडची जागा राखली. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांनी आघाडीच्या नामदेव उसंडी यांचा पराभव केला तर जळगावात लढतीत युतीचे अशोक पाटील विजयी झाले.
पाटील विरुद्ध पाटील
महाराष्ट्रातल्या
तीन मतदारसंघात पाटील विरुध्द पाटील अशा लढती रंगल्या. कधीही काँग्रेसने न गमावलेल्या
सांगली मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिक पाटील
यांना युतीच्या संजय पाटील यांनी धक्का दिला तर संवेदनशील अशा भिवंडीमध्ये आघाडीचे विश्वनाथ
पाटील यांना युतीच्या कपिल पाटील यांनी घरचा रस्ता दाखवला. भाजपचा गड
असलेल्या जळगाव मतदारसंघात युतीच्या अशोक पाटील
यांनी आघाडीच्या सतीश पाटील यांना पावणेचार
लाख मतांनी मात दिली.
सिनिअर गावित विरुद्ध ज्युनिअर गावित, संजीव विरुद्ध संजीव
सलग
दहाव्यांदा लोकसभेवर निवडून जाऊन विक्रम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माणिकराव गावित यांना वयाने निम्म्याहून कमी असलेल्या
युवा उमेदवार हीना गावित यांनी अनपेक्षितरीत्या
पराभूत केले तर ठाण्यातील जनतेने दोन्ही संजीव अर्थात राष्ट्रवादीचे संजीव नाईक आणि 'आप'चे संजीव
साने दोघांनाही घरी बसवले.
कोल्हापूरचे महाभारत,
मावळचे रामायण आणि मुंबईतले शिवपुराण !!!
कोल्हापुरात महाभारतातल्या
'अर्जुन' उर्फ धनजंय महाडिक यांनी धृतराष्ट्राचे सचिव 'संजय' अर्थात संजय मंडलिक
यांचा पराभव करून मंडलिक साम्राज्याला धक्का दिला. रामायणात लंकाधिपती रावणाला संपवण्यासाठी
प्रभू श्रीरामांच्या साथीत बंधू लक्ष्मण आणि
मारुती खांद्याला खांदा लावून लढले होते.
मावळच्या रामायणात मात्र एकमेकांच्या विरोधात लढलेल्या 'लक्ष्मण' जगताप आणि 'आप'च्या 'मारुती' भापकर यांना मोदी लाटेवर स्वार झालेल्या
श्रीरंग बारणे यांनी धूळ चारली. तर वायव्य
मुंबईत तर शंकर आणि गणपती अशा पिता पुत्रात अर्थात शिवसेनेचे
गजानन किर्तीकर आणि मनसेचे महेश मांजरेकर यांच्यातल्या लढतीत मुलगाच
सवाई ठरला.
महाराष्ट्रात
सर्वात धक्कादायक समजल्या जाणाऱ्या निकालांपैकी एक असलेल्या सोलापूर मतदारसंघात गृहमंत्री
सुशीलकुमार शिंदे यांना त्यांचे राजकीय गुरु असलेल्या शरद पवार यांचे नामसाधर्म्य असलेल्या शरद बनसोड यांनी अनपेक्षित मात दिली तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात माजी
केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा युतीच्या
नाना पटोले यांनी सव्वा लाख मतांनी पराभव
केला.
