Saturday, November 17, 2012

'बाळ' नावाचा 'बाप' माणूस !!!

                               केवळ 'साहेब' या एका शब्दावर मराठी माणसाला संघटीत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'बाळ केशव ठाकरे' अर्थात 'बाळासाहेब'... अवघ्या महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ आज शांत झाली.
                               हिंदुहृदयसम्राट, अवघ्या महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ही विशेषणे जणू त्यांच्यासाठीच लिहिली गेली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी माणसाच्या मनात असलेल्या असंतोषाला बाळासाहेबांनी वाचा फोडली. शिवतीर्थावर 'हाटाव लुंगी बजाव पुंगी' चा नारा देत शिवसेनेची स्थापना केली आणि अवघ्या महाराष्ट्राला झपाटले. मराठी माणसाला वैचारिक आणि भावनिक आधार देण्यात बऱ्यापैकी  यश मिळवले.
                               रोखठोक भाषणशैली हे बाळासाहेबांचे वैशिष्ठ्य. प्रसंगी ती शिवराळही असे पण त्या शैलीने मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला. मराठी मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवले. कॉम्रेड डांगे , जॉर्ज फर्नांडीस नंतर खऱ्या अर्थाने मुंबई बंद करण्याचे सामर्थ्य केवळ बाळासाहेबांनीच दाखवले. बाळासाहेबांच्या भाषणांवर अनेकदा टीका झाली, विविध गुन्हेही दाखल झाले पण त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. एका दिवशी एका विशिष्ठ ठिकाणी सलग ४० वर्षे भाषण करणे आणि ती ऐकण्यासाठी लाखो लोक येणे हा एक विक्रमच !!!
                                 बाळासाहेबांनी कायम स्वतःला पदापासून दूर ठेवले. ते कायमच म्हणायचे "मी कुठलेही मंत्रिपद स्वीकारणार नाही". हा त्यांनी स्वतः घालून घेतला नियम आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळला. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा मंत्र स्थापनेपासूनच शिवसैनिकांना त्यांनी दिला. बाळासाहेबांनी 'जातीपातीचे राजकारणही' कधीच केले नाही. १९९५ साली शिवशाही अवतरल्यावर 'मनोहर जोशींना' मुख्यमंत्री करून त्यांनी ह्याचा दाखला दिला. तर शिवाशाहीच्या काळात साबीर शेखांना मंत्री केले. जोशी सरानंतरही अनेक लोक इच्छुक असताना नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली.
                                  बाळासाहेबांनी आयुष्यात अनेक धक्के पचवले, मोठ्या धैर्याने पचवले.पक्ष स्थापनेपासून बरोबर असलेले अनेक सहकारी पक्ष सोडून गेल्यावर झालेले अनेक आघात त्यांनी सहन केले. प्रत्येक वेळेस ते एवढेच म्हणायचे "असल्या छोट्या मोठ्या धक्क्यांनी माझ्या शिवसेनेला काहीही होणार नाही.". वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक वादळे पचवली. १९९८ च्या सुमारास त्याच्यावर तिहेरी आघात झाला. काही महिन्यांच्या अंतरात त्यांनी मुलगा बिंदा (बिंदुमाधव ठाकरे) आणि पत्नी (सर्वांच्या मांसाहेब) यांना गमावले. आणि त्याच बरोबर स्वतःवर अतिशय महत्त्वाची अशी बायपास शस्त्रक्रियाही करून घेतली. एखादा माणूस अशा धक्क्यात केव्हाच कोसळला असता पण बाळासाहेबांनी ह्या सर्व परिस्थितीला अतिशय धीराने तोंड दिले. २००५ च्या सुमारास राज ठाकरेंनी सेना सोडण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांना बसलेला शेवटचा धक्का. त्याची सल त्यांना कायम होती. पण तरीही ते कोसळले नाही.
                                    बाळासाहेब हे स्पष्टवक्ते, बिनधास, दिलदार व्यक्ती होते. कुठलीही राजकीय भूमिका घेताना त्यांनी मतपेट्याचे राजकारण केले नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला तर इंदिरा गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत शीख समाजाला अभय देण्यासाठी स्वतः मुंबईत गुरुद्वारात जाऊन आवाहन केले.
एवढा मोठा जनाधार असलेला,वादग्रस्त, कडवा तरीही प्रचंड लोकप्रिय, प्रादेशिक राजकारण करणारा पण तरीही राष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव टाकणारा नेता, शरद पवारांपासून, वाजपेयींपर्यंत, आणि लता मंगेशकरांपासून ते मायकल जैक्सन पर्यंत सगळ्यांशी मैत्री असणारे बाळासाहेब म्हणजे एक वेगळंच रसायन !!!  बाळासाहेबांबद्दल बोलताना एक मोठा नेता म्हणाला होता.                                                           
                                      "He is not Individual,
                                        He is not institution,
                                        He is phenomenon !!!"

खरच आज एका पर्वाची अखेर झाली.


Tuesday, October 2, 2012

आव्हानात्मक सरसगड !!!

पावसाळ्यात आव्हान निर्माण करणारा किल्ले-सरसगड !!!!

सरसगड हे सुधागड डोंगररांगेतले एक उत्तुंग दुर्गशिल्प. पाली गावाचं रक्षण करत , गावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला सरसगड एका ताकदवान सैनिकाप्रमाणे भासतो. पावसाळ्यात तर सारा कोकणच हिरव्या नवलाईने नटलेला असतो. सरसगड तरी त्याला कसा अपवाद असणार !!! सकाळी ७.०० वाजता पुण्याहून रोह्याची एसटी बस निघते आणि एका नयनरम्य प्रवासाला प्रारंभ होतो. निगडी, देहूगाव, तळेगाव प्रवास करत लोणावळा कधी येते काळातच नाही. अर्थात मळवलीला लोहगड- विसापूर ह्यांची जोडी दर्शन देते... पण धुक्यातच... लोणावळा-खंडाळा येत येत धुके दाट होत जाते. नागफणी चा सुळका तर धुक्याची घनदाट चादर लपेटून शांत बसलेला. खोपोलीमार्गे पाली रस्त्याला लागतो... आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार भात शेते डोळ्याला सुखावतात... १०.३०च्या सुमारास एसटी पालीला पोहोचते आणि मोहिमेला सुरुवात होते.

रविवार असूनही पाली गावात चांगलीच वर्दळ होती. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोकणात पाऊस बऱ्यापैकी होता. पाली गावात सकाळी सकाळी दक्षिणात्य पदार्थ पोटात ढकलून किल्ल्याकडे कूच केले. पुढे उशीर होईल ह्या उद्देशाने बाप्पाला बाहेरूनच नमस्कार केला.  पाली गावाला वळसा घालून थोडे अंतर चालून गेल्यावर १६०० फुटाचा अजस्त्र सरसगड स्वागत करतो. सरसगडहा सुधागड डोंगररांगेतला किल्ला. ह्याचा उपयोग टेहेळणीसाठी व्हायचा. मळलेल्या वाटेवर थोडे अंतर चालून गेल्यावर थोडा सखल भाग लागतो. तेथून आजूबाजूच्या परिसर म्हणजे.. केवळ निसर्गरम्य... किती छायाचित्रे काढू आणि किती नको... नको.. डोळ्यातच साठवून घेऊ... गवतातून, झाडातून वाट काढत काढत पुढे गेलो आणि.... डोळ्याचे पारणे फिटेल असे दृश्य .... दोन कातळ कड्या मध्ये खोदलेल्या शंभर एक पायऱ्या !!! वाह !!! दिल खुश हो गया !!!
जसे जसे त्या कड्याच्या जवळ गेलो तसे तसे त्या कड्याची भव्यता, काहीशी कठीणता जाणवायला लागली. पावसामुळे बऱ्यापैकी निसरडे झाले होते. कातळावर शेवाळ्याचे अस्तित्व होते.  सरसगड आव्हान ठरणार असे वाटायला लागले... आव्हानाकडे पाठ फिरवून मागे फिरेल तो गडकरी कुठला !!! एकमेका सहाय्य करत, सूचना देत पायऱ्या चढायला सुरुवात झाली. दोन कातळ कड्याच्या मध्ये पायऱ्या ह्या अर्धवट तुटक्या अवस्थेत आहेत. डाव्या कड्यापासून सुरु झालेल्या पायऱ्या उजव्या कड्यापर्यंत जात नाहीत. पायऱ्या पूर्ण होत्या का नाही ... माहित नाही.. पण आता खोल दरी आहे. ३-४ फुटी पायरीवरून शिस्तीत एकामागोमाग जायचे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या तत्त्वानुसार !!! ४० एक पायऱ्या चढल्यावर मोह होतो मागे वळून बघण्याचा. उंचीची भीती वाटत नसेल तर एकदा नजर टाकायला हरकत नाही पण संपूर्ण पायऱ्या चढून गेल्यावर आरामात परिसर न्याहाळण्याची कल्पना जास्त योग्य. १०० पायऱ्यांची दमछाक झाल्यावर एक मजबूत प्रवेशद्वार आपले स्वागत करतो. प्रवेशद्वारावर कलश कोरलेला आहे. प्रवेशद्वाराजावळून सारा परिसर आणि कातळ कड्याचा भाग पाहून आश्चर्यचकित होतो... इथूनच आलो आपण ? !!! एक अनामिक आनंद !!! हाच दिंडी दरवाजा. दरवाज्यातून आत गेल्यावर एक मोठी खडकातली खोली अर्थात देवडी. एवढे परिश्रम झाल्यावर थोडी विश्रांती ही हवीच.. आणि विश्रांतीबरोबर थोडी न्याहारी म्हणजे सोने पे सुहागा !!! दरवाजातून ८-१० पायऱ्या चढून गेले की तटबंदी लागते. तटबंदीचे बरेचसे नुकसान झाले आहे. तरीही येथे तिहेरी तटबंदीची रचना दिसते...
तेथून थोडी चढण चढल्यावर... काही गुहा , खराब पाण्याच्या टाक्या... गड तसा दुर्गम असल्याने प्लास्टिकचा वावर कमी दिसला.. आनंद वाटला... तेथून डावीकडे चालत गेल्यास बालेकिल्ल्याचा पायथा लागतो. हा रस्ताही तसा कठीणच.. पावसामुळे सर्वत्र शेवाळ आणि निसरडे.. जपून टाक पाऊल गड्या ... झाडाझुडपातून वाट काढत काढत बालेकिल्ल्याच्या मार्गाला लागलो. बालेकिल्ल्याच्या मार्गात अंतिम टप्प्यात असताना शेवटी पावसाने गाठलेच... आणि मग एका खडकावर आधार घेतला..  तेथून समोरचा नजारा... केवळ अवर्णनीय.. खाली टुमदार पाली गाव...सर्वत्र हिरवेगार डोंगर... पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी अंबी नदी.. हिरवीगार शेते.... कोकणात खाली उतरणारे वळणावळणाचे रस्ते.... एक Panorama तो बनता ही है  यार !!!    तेथे बसून समोरच्या धुक्यातला पाऊस बघणे.. एक रोमांचकारी अनुभव  …तो हळू हळू आपल्याकडे माग्रक्रमण करतो.. आपल्याला येथेच्च भिजवून परत नामानिराळा… अशी ३-४ आवर्तने झाली …  नखशिखान्त भिजलो .. आणि मग तेथेच न्याहारी आटोपून परतीची वाट धरली…

परतताना पाली गावं .. खोपोली…लोणावळा .. लोणावळा रेल्वे स्टेशन.. शिवाजी नगर मार्गे घरी पोहोचायला १२ वाजले … पण घरी पोहोचल्यावर एक थरारक अनुभव घेतल्याचा अवर्णनीय आनंद…

खरंच.. आव्हान निर्माण करणाऱ्या सरसगडला पावसाळ्यात एकदा जायलाच हवे !!!