Saturday, November 17, 2012

'बाळ' नावाचा 'बाप' माणूस !!!

                               केवळ 'साहेब' या एका शब्दावर मराठी माणसाला संघटीत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'बाळ केशव ठाकरे' अर्थात 'बाळासाहेब'... अवघ्या महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ आज शांत झाली.
                               हिंदुहृदयसम्राट, अवघ्या महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ ही विशेषणे जणू त्यांच्यासाठीच लिहिली गेली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी माणसाच्या मनात असलेल्या असंतोषाला बाळासाहेबांनी वाचा फोडली. शिवतीर्थावर 'हाटाव लुंगी बजाव पुंगी' चा नारा देत शिवसेनेची स्थापना केली आणि अवघ्या महाराष्ट्राला झपाटले. मराठी माणसाला वैचारिक आणि भावनिक आधार देण्यात बऱ्यापैकी  यश मिळवले.
                               रोखठोक भाषणशैली हे बाळासाहेबांचे वैशिष्ठ्य. प्रसंगी ती शिवराळही असे पण त्या शैलीने मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला. मराठी मनावर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवले. कॉम्रेड डांगे , जॉर्ज फर्नांडीस नंतर खऱ्या अर्थाने मुंबई बंद करण्याचे सामर्थ्य केवळ बाळासाहेबांनीच दाखवले. बाळासाहेबांच्या भाषणांवर अनेकदा टीका झाली, विविध गुन्हेही दाखल झाले पण त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. एका दिवशी एका विशिष्ठ ठिकाणी सलग ४० वर्षे भाषण करणे आणि ती ऐकण्यासाठी लाखो लोक येणे हा एक विक्रमच !!!
                                 बाळासाहेबांनी कायम स्वतःला पदापासून दूर ठेवले. ते कायमच म्हणायचे "मी कुठलेही मंत्रिपद स्वीकारणार नाही". हा त्यांनी स्वतः घालून घेतला नियम आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळला. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा मंत्र स्थापनेपासूनच शिवसैनिकांना त्यांनी दिला. बाळासाहेबांनी 'जातीपातीचे राजकारणही' कधीच केले नाही. १९९५ साली शिवशाही अवतरल्यावर 'मनोहर जोशींना' मुख्यमंत्री करून त्यांनी ह्याचा दाखला दिला. तर शिवाशाहीच्या काळात साबीर शेखांना मंत्री केले. जोशी सरानंतरही अनेक लोक इच्छुक असताना नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली.
                                  बाळासाहेबांनी आयुष्यात अनेक धक्के पचवले, मोठ्या धैर्याने पचवले.पक्ष स्थापनेपासून बरोबर असलेले अनेक सहकारी पक्ष सोडून गेल्यावर झालेले अनेक आघात त्यांनी सहन केले. प्रत्येक वेळेस ते एवढेच म्हणायचे "असल्या छोट्या मोठ्या धक्क्यांनी माझ्या शिवसेनेला काहीही होणार नाही.". वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक वादळे पचवली. १९९८ च्या सुमारास त्याच्यावर तिहेरी आघात झाला. काही महिन्यांच्या अंतरात त्यांनी मुलगा बिंदा (बिंदुमाधव ठाकरे) आणि पत्नी (सर्वांच्या मांसाहेब) यांना गमावले. आणि त्याच बरोबर स्वतःवर अतिशय महत्त्वाची अशी बायपास शस्त्रक्रियाही करून घेतली. एखादा माणूस अशा धक्क्यात केव्हाच कोसळला असता पण बाळासाहेबांनी ह्या सर्व परिस्थितीला अतिशय धीराने तोंड दिले. २००५ च्या सुमारास राज ठाकरेंनी सेना सोडण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांना बसलेला शेवटचा धक्का. त्याची सल त्यांना कायम होती. पण तरीही ते कोसळले नाही.
                                    बाळासाहेब हे स्पष्टवक्ते, बिनधास, दिलदार व्यक्ती होते. कुठलीही राजकीय भूमिका घेताना त्यांनी मतपेट्याचे राजकारण केले नाही. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा दिला तर इंदिरा गांधी हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत शीख समाजाला अभय देण्यासाठी स्वतः मुंबईत गुरुद्वारात जाऊन आवाहन केले.
एवढा मोठा जनाधार असलेला,वादग्रस्त, कडवा तरीही प्रचंड लोकप्रिय, प्रादेशिक राजकारण करणारा पण तरीही राष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव टाकणारा नेता, शरद पवारांपासून, वाजपेयींपर्यंत, आणि लता मंगेशकरांपासून ते मायकल जैक्सन पर्यंत सगळ्यांशी मैत्री असणारे बाळासाहेब म्हणजे एक वेगळंच रसायन !!!  बाळासाहेबांबद्दल बोलताना एक मोठा नेता म्हणाला होता.                                                           
                                      "He is not Individual,
                                        He is not institution,
                                        He is phenomenon !!!"

खरच आज एका पर्वाची अखेर झाली.


1 comment:

  1. Beside my conceptual disputes with this person, I must admire the influence of this person on common man (particularly Hindus) in Maharashtra...
    And I always think, this is best example of how easily people personify qualities (which as per my view not good for any community/society)

    ReplyDelete